सिंधुदुर्ग,दि.१७ : विलवडे गावचे सुपुत्र तथा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक सुभाष दळवी यांनी आदर्श घन कचरा व्यस्थापन अर्थात पर्यावरण विषयक जनजागृतीच्या कार्यात महान योगदान दिल्याबद्दल त्यांना इंडियन इंडस्ट्रीज अँड इंटरप्रिनर्शिप फोरम व रेड एंट मिडियाचा यावर्षीचा ‘पिलर्स ऑफ महाराष्ट्र २०२३ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रसिध्द गायिका उषा मंगेशकर, अभिनेत्री सुधा चंद्रन, लोढ़ा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढ़ा, सुभाष दळवी यांच्या पत्नी डॉ. श्रद्धा दळवी आदी उपस्थित होत्या.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी व स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी हे आज देशभरातील विविध धार्मिक स्थळी दिसणाऱ्या निर्माल्य कलशांचे ते जनक आहेत. शुन्य कचरा वस्ती, कचऱ्यापासून खत निर्मिती, कोणत्याही प्रकारचा दुर्गंध न जाणवणा-या दळवी पॅटर्न – ‘स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम अँड ऑरगॅनिक फार्मिंग विषयक प्रकल्प देशासाठी आदर्शवत आहेत. त्यांच्या या स्वच्छता व पर्यावरण संतुलन कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सुभाष दळवी यांचे लोकसहभागातून ‘धारावी स्वच्छतेचे मॉडेल’ आज़ सर्वांनाच परिचित आहे. त्याचबरोबर जलप्रदूषण रोखण्यासाठीचे निर्माल्य कलश, निर्माल्य व्यवस्थापन, होम कंपोस्ट, कचरा वर्गीकरण, वस्ती पातळीवर कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम अँड ऑरगॅनिक फार्मिंग’, प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधातील अभियान, मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी दत्तक वस्ती योजना यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजनांची संकल्पना सुभाष दळवी यांचीच आहे.
मुंबई स्वच्छ आणि सुंदर रहावी यासाठी सुभाष दळवी यांच्या अविश्रांत मेहनतीचे अनेक मुख्यमंत्री, मंत्र्यांसह कित्येकजण साक्षीदार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्रकिनारे, झोपडपट्ट्या आणि रेल्वे ट्रॅक जवळचा परिसर या ठिकाणी पहाटे ४ पासून चीरपरिचित शिट्टी घेऊन लोकांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्यास प्रेरित करणारे सुभाष दळवी अनेकांनी अनुभवले आहेत. त्यांच्या या स्वच्छता व पर्यावरण संतुलन कार्याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली
स्वच्छता व पर्यावरण संतुलनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी असुन संयुक्त राष्ट्र संघाने देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी आणि डॉक्टर ऑफ लिटरेचर यासारख्या सन्माननीय पदव्यांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे. सुभाष दळवी यांच्या मुंबईतील आदर्शवत स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाच्या ‘दळवी पॅटर्न’ ची गुजरातच्या स्वच्छता अभियान विभागाने दखल घेऊन त्यांच्या स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाच्या सर्व प्रकल्पांची पाहणी करून ‘दळवी पॅटर्न’ चे कौतुक केले. सुभाष दळवी हे सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी यांचे भाऊ असुन हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सुभाष दळवी यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.