सावंतवाडी,दि.१६: डेगवे येथील शासकीय जंगलात आपल्या
खैरतोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सुदीन आगरवडेकर याला वनविभागाकडून अटक– डेगवे येथील शासकीय जंगलात आपल्या साथीदारांसह तोड करून १८ मे पासून फरार असलेल्या आरोपी सुदीन श्रीराम आगरवडेकर याला काल वन विभागाने अटक केली. तसेच आरोपीने खैर वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पिक-अप देखील हस्तगत करून जप्त करण्यात आली. आज सावंतवाडी न्यायालयात त्याला हजर केले असता गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सावंतवाडी न्यायालयाकडून त्याला एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वीच जिल्हा सत्र न्यायालयाकडून सदर आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. सुदीन आगरवडेकर हा डेगवे खैर तोडीतील मुख्य सूत्रधार असल्या कारणाने खैर तस्करीतील बऱ्याच नवीन गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गुप्तबातमी वरून फरार आरोपी सुदिन श्रीराम आगरवडेकर व त्याचे इतर दोन साथीदार यांना डेगवे येथील शासकीय जंगलात कटरच्या सहाय्याने तोड करून खैर वाहतूक करताना पकडण्यासाठी वन विभागाकडून सापळा लावण्यात आला. दिनांक १८ मे रोजी या तिघांपैकी एक साथीदार महेश कुडव, वय-१८ वर्षे, रा.इन्सुलि याला रंगेहाथ पकडण्यात आले तर सुदीन आगरवडेकर व त्याचा दुसरा साथीदार मंथन आईर, वय-१६ वर्षे, रा.वाफोली हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. या दोन फरार आरोपींपैकी मंथन आईर हा आरोपी दिनांक २४ मे रोजी स्वतःहून वन अधिकारी यांचे समक्ष तपासात सहकार्य करणेकामी हजर झाला परंतु दुसरा फरार आरोपी सुदिन श्रीराम आगरवडेकर हा आजतागायत फरार होता. फरार आरोपी सुदीन आगरवडेकर याने ओरोस सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी देखील अर्ज दाखल केला होता, त्याची सुनावणी होऊन मा.जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी फरार आरोपीवर ताशेरे ओढत त्याचा जामीनअर्ज फेटाळून लावला होता. आज सावंतवाडी न्यायालयात झालेल्या सुनावणी मध्ये अद्याप आरोपीने गुन्ह्यात वापरलेली इतर वाहने व खैर झाडे तोडण्यासाठी वापरलेली हत्यारे मिळून आली नसल्याने तसेच आरोपी यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू तस्करीच्या गुन्ह्यात देखील आरोपी असल्याचे वन विभागाकडून या मा.न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या सुनावणी दरम्यान वन विभागाची बाजू तपास अधिकारी तथा सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व सरकारी वकील यांनी प्रभाविपणे मांडली. तर आरोपीच्या वतीने सावंतवाडीचे वकील श्री.राहुल पै यांनी कामकाज पाहिले.