राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी बस व्यवस्थापकांना दिले मागणीचे निवेदन..
सावंतवाडी,दि.१२: आषाढीच्या वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी बंधु-भगिनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक परंपरेचा व सामाजिक एकतेचा हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. यंदाही आषाढी वारीच्या पुर्वतयारीसाठी विविध सरकारी विभाग कामाला लागले आहेत. कोकणातून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता सावंतवाडी आगाराच्या माध्यमातून खाली नमूद केलेल्या सुविधा वारकरी बांधवांना देण्यात अशी विनंती अर्चना घारे यांनी सावंतवाडी बस डेपोचे व्यवस्थापक श्री नरेंद्र बोधे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यात प्रामुख्याने वारकऱ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात याव्यात, एखाद्या गावातून वारकऱ्यांनी मोठ्या गटाने आरक्षण केल्यास थेट त्या गावापासून बस उपलब्ध करून देण्यात यावी.आषाढी वारीसाठी गाड्यांचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.वारीत सहभागी वारकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात यावे.या मागण्या मान्य करून येणारी आषाढी वारी समस्त वारकरी बंधू भगिनींना आनंदाची जावी यासाठी आपले बहुमोल योगदान द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, जिल्हा निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू, वैभव वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.