सावंतवाडी, दि. ०७ : सावंतवाडीतील मंगळवार आठवडा
बाजारातील व्यापाऱ्यांसाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे ॲग्रिकल्चर टेन्ट (छत्र्या) उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांना ऊन, पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळाले आहे. आठवडा बाजारात व्यापारासाठी येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. त्याचा शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात करण्यात आला.
केसरकरांनी मंगळवारी सकाळी आठवडा बाजाराला भेट देऊन पाहणी केली. मंगळवारचा आठवडा बाजार पंधरा दिवसांपूर्वी शासकीय धान्य गोदाम येथे हलविण्यात आला. त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तेथील परिसराची स्वच्छता, गटार, डांबरीकरण, वीजपुरवठा आदी सुविधा देण्याचे केसरकरांनी जाहीर केले होते. त्यानुसार सर्व सुविधांची पावसाळ्यापूर्वी पूर्तता करण्यात आली. तसेच व्यापाऱ्यांना उन्हाचा त्रास व पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी सर्व व्यापाऱ्यांना छत्र्या देण्याचीही पूर्तता केली. जवळपास १२५ व्यापाऱ्यांना छत्र्या देऊन त्या नियोजनबद्ध लावण्यात आल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांना सुलभरित्या माल खरेदी-विक्री करता येणार आहे. केसरक यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्द व्यापाऱ्यांनी आभार मानले.