Site icon Kokandarshan

मुंबई गोवा चौपदरी महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या…

तालुका पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी,दि.०७: सावंतवाडी रेल्वे टर्मिनलचे अपूर्ण काम पूर्ण करा आणि वंदे भारत रेल्वेला सावंतवाडी थांबा द्या आणि राष्ट्रीय महामार्ग गोवा मुंबई एन एच ६६ ला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या या मागणीचे लेखी निवेदन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी येथे देण्यात आले.
सावंतवाडी येथे नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा महाराज भाजी मंडईच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री सावंतवाडी येथे आले असता त्यांना हे निवेदन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी संघाचे सचिव मयूर चराटकर सहसचिव विनायक गांवस,खजिनदार रामचंद्र कुडाळकर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यु लोंढे कार्यकारणी सदस्य राजू तावडे नरेंद्र देशपांडे माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर विजय देसाई,मोहन जाधव,जतिन भिसे,अनिल भिसे आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री नामदार शिंदे यांच्या समवेत राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर हेही उपस्थित होते
निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की,
सावंतवाडी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक विकसनशील व पर्यटनदृष्ट्या महत्वाचा जिल्हा असून महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणारा दुवा आहे. मात्र येथे रेल्वे टर्मिनलला मंजुरी मिळूनही त्या टर्मिनलचे काम पूर्ण झालेले नाही. शिवाय नव्या भारताचे स्वप्न साकारणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या रेल्वेलाही कणकवली वगळता जिल्ह्यात अन्यत्र कोठेही थांबा नसल्याने तो थांबाही सावंतवाडीत मिळावा अशी नम्र मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
देशात अग्रेसर असणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र सर्वच बाबतीत प्रगती पथावर आहे. मिळालेल्या संधीचे सोनं करण्यासाठी पायात चक्र बांधून ज्याप्रमाणात भ्रमंती करीत आहात, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. याच आपल्या कर्तृत्वामुळे आपण सर्वसामान्यांचा ‘मसिहा अशी आपली प्रतिमाही निर्माण झाली आहे.
कोकण आणि आपले एक अतुट नाते आहे. हे नाते अधिक दृढ करण्यासाठी आपण अल्पावधीतच कोकणचे जे प्रलंबित विषय होते तेही तातडीने मार्गी लावल्याने आम्हा कोकणवासीयांना आपल्याकडून मोठी विकासाची आस निर्माण झाली आहे. तरी या मागणीची पूर्तता करण्यासाठी केंद्रशासनाकडे शिफारस व्हावी, अशी मागणी करण्यात आले याशिवाय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला (NH66)आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी तालुका पत्रकार संघाच्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की
केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या कामाला मंजुरी देऊन कोकणवासीयांची कित्येक वर्षाची मागणी पुर्ण केली आहे. सदर महामार्गाला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक तथा सिंधुदुर्ग सुपुत्र कै. बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देऊन त्यांचे नाव अजरामर करावे
तसेच दहा वर्षे उलटूनही सिंधुदुर्ग वगळता रायगड व रत्नागिरी या भागात कामे अपूर्ण असल्याने महामार्ग पूर्णत्वास आला नाही. त्यामुळे कोकणवासीयांनी मुंबईमध्ये ये-जा करण्यासाठी व्हाया पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करावा लागतो. परिणामी वेळ व पैसा याचा अपव्यय होतो व मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे NH66 या महामार्गाचे प्रलंबित काम त्वरित पूर्ण करावे
अशी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version