सावंतवाडी,दि.३०: तालुक्यातील माडखोल ठाकूरवाडी अंगणवाडी मदतनीस पद रिक्त असून या बाबत श्रीमती संजना संजय आडेलकर रा. माडखोल यांनी संबंधित पदाबाबत अर्ज केलेला असून ती एक विधवा महिला आहे. शासनाच्या (जी.आर.) शासन निर्णयानुसार कुठल्याही महिला सेविका रिक्त पद हे प्राधान्याने विधवेला द्यावे असे आदेशात नमूद आहे. संबंधित रिक्त पदासाठी मी पात्र असूनसुद्धा आपल्या निवड यादीमध्ये प्राधान्याने प्रथम क्रमांकाने न येता माझे नाव ग्रामपंचायत मध्ये लावलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार दोन नंबरवर आहे. तरी आपणास विनंती आहे की, मी एक विधवा महिला असून माझे पती कोरोना कालावधीत मयत झालेले असून त्या पदापासून मला वंचित ठेवल्यास माझ्यावर तो एक प्रकारे आपण अन्याय केल्यासारखाच असेल, मी शासनाच्या सर्व प्रमाणे सदरच्या पदास पात्र असूनही जर माझ्यावर अन्याय झाल्यास मला आमरण उपोषणासारखा मार्ग अवलंबवावा लागेल, तरी मला आपण याबाबत योग्य तो न्याय देवून सदरच्या वर नमूद पदावर माझी नियुक्ती करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन आडेलकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिप.सिंधुदुर्ग ओरोस,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बालविकास कार्यालय ओरोस, गटविकास अधिकारी (वर्ग १) सावंतवाडी,महिला व बालविकास अधिकारी, सावंतवाडी यांना दिले आहे.
श्रीमती आडेलकर यांच्या उपोषणाला माडखोल ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे.