Site icon Kokandarshan

योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बना!

प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे आवाहन : सावंतवाडीत युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन

सावंतवाडी,दि.२५:
बदलत्या काळात आपल्यातील कलागुणांना वाव देऊन उद्योजक बनावे. आज शासनस्तरावरून तसेच सर्व पातळीवर विविध योजना आहेत. त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. शासनाच्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर योजनेचाही लाभ घ्यावा. तरुण-तरुणींकडे स्किल डेव्हलपमेंट आहे. पण, त्यासाठी त्यांनी स्वनिर्णय घेऊन पुढे यायला हवे, असे मत प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी येथे व्यक्त केले.
सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालयात कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ‘ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी ए. एस. मोहारे, सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोड, प्राचार्य एन. डी. पिंडकुरुवार, प्राचार्य जे. एल. गवस, प्राचार्य आर. ए. जाधव, प्राचार्य पी. बी. ढवळ, मुख्याध्यापक यू. आर. कुलकर्णी, सुचिता नाईक उपस्थित होते.
यावेळी दहावी-बारावीनंतरच्या करिअरच्या संधी यावर बी. एस. जांभेकर तर व्यक्तिमत्व विकास विषयावर एस. जी. ढोणूक्शे, विद्यार्थी समूदेशन शिवानी गरड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय शैक्षणिक योजना यावर एस. बी. जाधव यांनी मार्गदर्शन केले.
उद्घाटक पानवेकर पुढे म्हणाले, मी प्रारंभी खासगी शिकवण्या घेत होतो. त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेसाठी उतरलो आणि त्यातून प्रांताधिकारी म्हणून करिअर करू शकलो. आजच्या तरुणांना अनेक संधी आहेत. त्या संधीचा लाभ घेऊन उद्योजक बना.
तहसीलदार उंडे यांनी कौशल्य विकास फार महत्वाचे आहे. कौशल्य विकासच्या माध्यमातून आजच्या तरुण-तरुणींनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्यायला हव्यात. शासनाच्या विविध योजना आहेत, त्यांचा लाभ घ्यायला हवा, असे सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी मार्गदर्शन केले. आभार सावंतवाडी आयटीआयचे प्राचार्य एन. डी. पिंडकुरुवार यांनी मानले.

Exit mobile version