Site icon Kokandarshan

आंबोली जंगलातील “ट्रॅप कॅमेरे” चोरण्यामागे शिकारी असण्याची शक्यता…

शिवप्रसाद ठाकुर; सखोल चौकशी करून कारवाई व्हावी, वनविभाग पोलिसांकडे मागणी…

सावंतवाडी,ता.२५: आंबोली-चौकुळ येथे जंगलात लावण्यात आलेले “ट्रॅप कॅमेरे” चोरण्यामागे शिकार्‍यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणी सावंतवाडी पोलिस व वनविभागाने सखोल चौकशी करावी, आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सावंतवाडी येथील प्राणीमित्र शिवप्रसाद ठाकुर यांनी केली आहे.
गेले काही दिवस आंबोली तसेच परिसरातील जंगलात पर्यटनाच्या नावावर फिरणार्‍या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुर्मिळ वन्यप्राण्यांशी शिकार होणार नाही, याकडे सुध्दा वनविभागाने गांर्भीयाने लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आंबोली, गेळे, चौकुळ येथे जंगलात वन्य प्राण्यांचा शोध लावण्यासाठी वनविभागाकडुन लावण्यात आलेले तीन ट्रॅप कॅमेरे अज्ञात चोरट्याने चोरले आहेत. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्राणीमित्र असलेल्या श्री. ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, या ठिकाणी सर्वसामान्य माणूस इतक्या घनदाट जंगलात फिरत नाही. यात कोणी तरी शिकारीच्या उद्देशाने गेला असावा आणि त्याने शिकार केल्यानंतर त्याला आपण कॅमेर्‍यात कैद झालो याचा अंदाज आला असावा, त्यामुळे अडचण निर्माण होवू नये यासाठी हा प्रकार त्याने केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून याबाबत सखोल चौकशी करून या प्रकारामागे नेमका कोण? याचा शोध घ्यावा, अशी मागणी ठाकुर यांनी केली आहे.

Exit mobile version