सावंतवाडी,दि.२३ : चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून प्रवाशांने कोकण रेल्वेत चहा विकणाऱ्या दिलीप सिंग या विक्रेत्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास मडगाव एलटीटी या रेल्वे गाडीत सावंतवाडी जवळ घडली. हल्लेखोर व्यक्ती जखमी अवस्थेत झाराप रेल्वे स्थानक परिसरात आढळून आली असून त्याला बाहेर ढकलून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान हल्लेखोर हा मद्यपान करून असल्याने काहि बोलण्याच्या मनस्थितीत नसून ओरोस येथील रूग्णालयात त्याला दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी मडगाव हून लोकमान्य टिळक टर्मिनल या रेल्वेतून प्रवास करत असलेल्या एक प्रवाशाने चहा घेतली होती या चहाचे पैसे सावंतवाडी जवळ आल्यावर चहा विक्रेत्या दिलीप सिंग याने मागितले पण प्रवाशांने पैसे न देताच चहा विक्रेत्यांशी हुज्जत घातली त्यातच प्रवाशाच्या बॅगेत छोटा चाकू होता त्याने चहा विक्रेत्या सिंग यांच्या गळ्यावर वार केला यात चहा विक्रेता जखमी झाला.
त्यानंतर लागलीच रेल्वेतील इतर प्रवाशांनी या हल्लेखोराला प्रतिकार केला त्यातच तो मद्यपान केलेला असल्याने त्याने सर्व प्रवाशांना ही उध्दट बोलण्यास सुरुवात केली या मुळे प्रवाशी ही चांगलेच घाबरले होते.त्यांनी त्या प्रवाशाला चक्क रेल्वेतून बाहेर काढत झाराप रेल्वे स्थानकावर ढकलून दिले.तसेच कणकवली येथील रेल्वे पोलिसांना फोन करून झालेल्या घटनेची कल्पना दिली.
त्यानंतर रेल्वे पोलिसांनी झाराप येथे येऊन जखमी सिंग यांला अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर झाराप येथे ढकलून देण्यात आलेला तो प्रवासी गंभीर जखमी झाला असून तो बेशुद्ध आहे. त्याला ओरोस येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.तो नेमका कुठचा, कुठून आला होता हे कळू शकली नाही.
दरम्यान सावंतवाडी परिसरात याबाबतची घटना घडल्याचे समजताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असून.ते या प्रकरणाची माहिती घेत आहेत.यातील जखमी दिलीप सिंग या जखमी ने कणकवली पोलिसांकडे तक्रार दिली आहे.पोलीस त्याचा जाबजबाब नोंदवत आहेत.
त्यानंतर हे प्रकरण सावंतवाडीत वर्ग केले जाणार आहे. घटना जरी सावंतवाडी हद्दीत घडली असली तरी हल्लेखोर हा झाराप येथील रेल्वे स्थानकात पडला होता.त्यामुळे हे स्थानक कुडाळ च्या हद्दीत येत असल्याने या प्रकरणाचा तपास कोण करणार याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून प्रवाशांने कोकण रेल्वेत चहा विकणाऱ्या दिलीप सिंग या विक्रेत्यावर चाकूने प्राणघातक हल्ला..

