मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या पुढाकाराने चिपळूण वासियांना घेता येणार नामवंत गायकांच्या गाण्यांचा आनंद
सोमवारी चिपळूणात स्वरदीपावली चे आयोजन
चिपळूण,०४ :कोरोना संकटकाळ, चिपळूण मधील महापूर या मागील दोन वर्षाच्या कालखंडा नंतर चिपळूण वासियांना एक सुरेल गाण्यांचा आनंद मिळावा म्हणून चिपळूण नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या संकल्पनेतून ,पालिका कर्मचारी संघटना,पालिकेशी निगडित व्यावसायिक आणि दानशूर मंडळी यांच्या सहकार्यातून एक आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात येत आहे,सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे सायंकाळी ६ वा . स्वरदीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नगर परिषदेने लोकसहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात प्रसिध्द गायक स्वप्नील बांदोडकर, अंशुमन विचारे, इशानी पाटणकर यांच्या गाण्यांची मेजवानी नागरिकांना
मिळणार आहे. १ हजार ५०० नागरिक हा कार्यक्रम पाहतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे
यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. २००५ मध्ये महापुरात बुडालेले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अद्यापही सुरू होऊ शकलेले
नाही. त्यामुळे एकेकाळी सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेली चिपळूणची ओळख जाते की काय, अशी भीती नागरिकांना वाटत ह
आहे. काही नाटक आयोजकांनी अधूनमधून अन्य ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक अडचणींमुळे मोठे कार्यक्रम
येथे करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांची हौस लक्षात घेता नगर परिषदेने पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाची माहिती देताना मुख्याधिकारी शिंगटे म्हणाले की, काही वर्षे कोरोना, महापूर अशा संकटात गेली. त्यामुळे आपण सर्वजण एका वेगळ्या वातावरणात होतो. मात्र आता त्यातून बाहेर पडलो असून पूर्वीचे आनंदी वातावरण पुन्हा तयार करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
नगर परिषद कर्मचारी संघटना, ठेकेदार व अन्य नगर परिषदेशी संबंधित लोकांच्या सहकार्यातून
हा कार्यक्रम होत आहे. स्वरदीपावली असे या कार्यक्रमाचे नाव असून तो तीन तास चालणार आहे. या कार्यक्रमात प्रसिध्द गायक स्वप्नील
बांदोडकर, अंशुमन विचारे, इशानी पाटणकर यांच्या एकापेक्षा एक बहारदार गाण्यांसह अन्य कार्यक्रमांचा यात समावेश राहणार असल्याचे
शिंगटे यांनी सांगितले. यावेळी उपमुख्याधिकारी बाळकृष्ण पाटील,
प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय अधिक्षक अनंत मोरे, नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बापू साडविलकर, राजेंद्र खातू आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते, संतोष
शिंदे आदी उपस्थित होते.