भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य..
सावंतवाडी, दि.१४: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी या प्रतिष्ठानच्यावतीने निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सुमारे ६३ बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी करून औषधेही देण्यात आली.
शिबिराचे उद्द्घाटन कारागृह अधीक्षक संदीप एकाशींगे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याने बंदीवानांसाठी या प्रतिष्ठानच्यावतीने निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ नंददिप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात सर्व बंदीवानांसह अधिकारी तसेच कर्मचारी बांधवांना धनुर्वाताची लसही देण्यात आली.
यावेळी कारागृहात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक संदीप एकाशींगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तर तुरुंगाधिकारी ब्रह्मदेव लटपटे यांनी कारागृहात आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.
सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू – भगिनींसाठी राबविले आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही देण्यासह सुमारे अडीज वर्षे प्रत्येक मंगळवारी प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. तसेच व्याख्याने आयोजनासह महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप, आवश्यक साहित्य वाटप, योग दिन, दोन वेळाआरोग्य शिबीर आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात सुमारे ४ महिने प्रत्येक रविवारी बंदिवान बंधुकरिता प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, अँड्र्यू फर्नांडिस, प्रशांत कवठणकर, आनंद मेस्त्री, भगवान रेडकर, गुरुनाथ राऊळ, श्रीकांत दळवी, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर, निलेश माणगावकर यांनी केले. तर कारागृह कर्मचारी सुभेदार विनोद शिरगावकर, सतिश मांडे, हवालदार रमाकांत यादव सुभाष काळे, विनोद खोडके, हणमंत माने, नरेंद्र चव्हाण, सतिश मांडे, सिद्धी गावडे, सागर सपाटे, मनोहर बोंबले, गीतांजली नाईक राहूल मुनेश्र्वर यांचे सहकार्य लाभले.