Site icon Kokandarshan

निगुडे सरंपच लक्ष्मण निगुडकर यांचे १४ एप्रिल ला सेानुर्ली-निगुडे तिठा येथे शासनाविरोधात आंदोलन..

सावंतवाडी,दि.११ : तालुक्यातील निगुडे सीमेवर असलेल्या इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली आदी भागात सुरू असलेल्या क्वारीवर कधीही भूसुरंग लावले जात असल्यामुळे गेल्या चार ते पाच वर्षात पाचशेहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे या सर्व घरमालकांना भरपाई मिळावी, तसेच अन्य मागण्यांसाठी निगुडे सरंपच लक्ष्मण निगुडकर यांनी १४ एप्रिल ला सेानुर्ली-निगुडे तिठा येथे सकाळी १० वाजता आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून दिला आहे.
अवजड वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता दिलेला असताना या ठिकाणी शेर्ले, निगुडे, सातार्डा हा रस्ता वाहतुकीसाठी वापरला जात आहे. त्यामुळे ही वाहतूक रोखण्यात यावी, तसेच २४ तास सुरू असलेले काम वेळ ठरवून करण्यात यावे, अशी मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे. क्वारी व्यावसाय करणार्‍या क्वारी मालकांकडुन चुकीच्या पध्दतीने सुरुंग स्फोट केले जात आहेत.
त्यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होत आहे. २०१८ पासून अद्याप पर्यंत संबंधित घरांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून सुध्दा अद्याप पर्यत कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण शासनाच्या विरोधात आंदोलन करीत आहे, असे ही निगुडकर यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

Exit mobile version