राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार निवासी शाळा
सावंतवाडी, दि.०९: राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आता आदर्शवत निवासी शाळा सुरू केल्या जाणार आहेत . सिंधुदुर्गात आंबोली गेळे येथे ५०० विद्यार्थी शमतेची निवासी शाळा लवकरच उभारण्यात येणार आहे. शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाइन करण्यात येणार आहेत .त्यामुळे शिक्षकांना आता शिक्षणधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठवावे लागणार नाहीत, अशी माहिती शालेय व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली . राज्यातील २० टक्के,४० टक्के आणि ६० टक्के टप्पा अनुदान वितरित करताना ज्या शाळा ३१ मार्चपर्यंत काही निकषात बसले नाहीत , त्यांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .सर्व राज्यातील शाळांना टप्पा अनुदान वितरित करण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केसरकर सावंवाडी येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना म्हणाले ,आपण केरळ येथे अभ्यास दौरा केला . राजस्थान व केरळच्या शिक्षणमंत्र्याशी आपली चर्चा झाली .
महाराष्ट्र राज्य हे देशात शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे . तसेच केरळ व राजस्थान ही दोन्ही राज्ये आघाडीवर आहेत . त्यामुळे त्या राज्यात ज्या नव्या व्यवस्था आहेत, त्या महाराष्ट्रात राबवता येतील का, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करत आहे , असे ते म्हणाले .
महाराष्ट्रात सर्व शिक्षण विभागात ऑनलाईन प्रणाली आणली जाणार आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात जावून कामे करणे आणि शिक्षण विभागाचे ठोठवावे लागणार नाहीत , असेही केसरकर यांनी सांगितले .
राज्यात शाळांना टप्पा अनुदानासाठी ११हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार ज्या शाळा टप्पा अनुदानास पात्र होत्या , त्यांना ३१ मार्चपूर्वी अनुदान वितरित करण्यात आले आहे मात्र ,काही शाळांना त्रुटींसाठी दुरुस्ती करून येत्या ३० एप्रिलपर्यंत टप्पा अनुदान वितरीत करण्याचा दृष्टिने शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत . कुठलीही शाळा टप्पा अनुदानापासून वंचित राहणार नाही ,यांची काळजी घेतली जाईल . काही त्रुटी असतील त्या दूर केल्या जातील , असे त्यांनी स्पष्ट केले .
यावेळी कुडाळ लोकसेवा संघाचे अध्यक्ष सुभाष भिसे , खजिनदार रमा रामानंद शिरोडकर , वाडोस हायस्कूलचे मुखयाध्यापक सराफदार यांनी टप्पा अनुदानातील त्रुटी दूर कराव्यात , अशी मागणी केली .
विद्यार्थी पटसंख्येच्या निकषासंदर्भात काही त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील , असेही केसरकर यांनी स्पष्ट केले . यावेळी शिवसनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे , जिल्हाप्रमुख अशोक दळवी , गजानन नाटेकर , जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब , बाळा जाधव , खरेदी- विक्री संघाचे उपाध्यक्ष रेडकर , सोनुर्ली सरपंच हिराप , पंचायत समिती माजी सदस्य हरमलकर , भारती मोरे , शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख ॲङ नीता सावंत , कसाल हायस्कूल शिक्षण संस्थेचे संचालक अवधूत मालवणकर व दया परब उपस्थित होते.