Site icon Kokandarshan

सावंतवाडीच्या ऐतिहासिक गंजिफा कलेला मिळणार नवसंजीवनी; बांदेकर कला महाविद्यालयात आकाशकंदील महोत्सवाचा शुभारंभ

नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांना मिळणार पारंपरिक गंजिफा चित्रशैलीचे थेट प्रशिक्षण

सावंतवाडी, दि.०४: सावंतवाडीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला उजाळा देणाऱ्या आकाशकंदील महोत्सवाचे स्थानिक बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयात अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. ऐतिहासिक सावंतवाडी संस्थानची ओळख असलेल्या पारंपरिक गंजिफा चित्रशैलीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी या विशेष उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. आधुनिक कलेच्या प्रवाहात वावरणाऱ्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांना आपल्या पारंपरिक लोककला आणि चित्रशैलीची सखोल ओळख व्हावी, हा यामागील मुख्य हेतू आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विशेष प्रशिक्षण वर्गात नगराध्यक्ष श्रद्धा भोसले या स्वतः गंजिफा चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत या क्षेत्रातील अनुभवी व ज्येष्ठ कलाकारांचाही या प्रशिक्षण वर्गात सहभाग असणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन करताना नगराध्यक्ष भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा केली. नवीन कला आत्मसात करत असतानाच आपल्या पारंपरिक लोककलांचा वारसा जपणे तितकेच आवश्यक असून, जुन्या कलापरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक कलाकाराचे आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सावंतवाडी संस्थानच्या ऐतिहासिक परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या गंजिफा कलेला पुनरुज्जीवित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून या पारंपरिक कलेचे बारकावे शिकण्याची संधी उपलब्ध झाल्याने कला क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी संस्थाध्यक्ष रमेश भाट, श्याम भाट, प्रकाश मसूरकर, गोविंद बांदेकर, अनुराधा परब, नकुल परसेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले आणि सर्व प्राध्यापक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Exit mobile version