Site icon Kokandarshan

निगुडे प्रकरणी महिलांचा आक्रमक पवित्रा; ठोस कारवाई न झाल्यास ५ नोव्हेंबरला धरणे आंदोलनाचा इशारा

संबंधित दुकानाचे बांधकाम व ग्रामपंचायतीच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी; सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांना महिलांचे निवेदन

सावंतवाडी,दि.३०: तालुक्यातील निगुडे येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर प्रकरणाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर तीव्रतेने उमटू लागले असून, या प्रकरणातील संबंधित दुकानाची सखोल चौकशी करून तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात निगुडे येथील महिलांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी विनायक पिंगुळकर यांच्यामार्फत गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, वेळेत समाधानकारक कारवाई न झाल्यास येत्या ५ नोव्हेंबर रोजी निगुडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा महिलांनी दिला आहे.

सादर करण्यात आलेल्या निवेदनात संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पीडितेला तातडीने न्याय मिळवून देण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. यासोबतच संबंधित दुकानाच्या बांधकामाची अधिकृत परवानगी, ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कराच्या नोंदी आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यास कायद्यानुसार तात्काळ निष्कासनाची कारवाई करावी, तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, अशी आग्रही मागणी महिलांनी केली आहे.

प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन लेखी खुलासा करावा, अन्यथा गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन केले जाईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हे निवेदन सादर करतेवेळी सौ. नम्रता राणे, तुलसी रेडकर, ममता नाईक, नेहा पोखरे, रोहिणी गावडे, संजना गावडे यांच्यासह निगुडे परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता पंचायत समिती प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version