Site icon Kokandarshan

साबणनिर्मितीतून विद्यार्थ्यांनी गिरविले उद्योजकतेचे धडे; तळवडेच्या जनता विद्यालयाचा यशस्वी प्रयोग

इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांकडून १२५ हून अधिक आयुर्वेदिक साबणांची विक्री; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी, दि.२२: केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता प्रत्यक्ष कृतीतून कौशल्ये आत्मसात करण्याच्या उद्देशाने येथील श्री जनता विद्यालयातील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी साबणनिर्मितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला. सरस्वती पूजनाच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पाच प्रकारच्या रंगीबेरंगी आयुर्वेदिक अंघोळीच्या साबणांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल लावला होता. अल्पावधीतच १२५ हून अधिक साबणांची विक्री करून या चिमुकल्या हातांनी प्रत्यक्ष उद्योजकतेचा यशस्वी अनुभव घेतला.

महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या नियोजनानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात ‘व्यवसाय मार्गदर्शन’ या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. या विषयांतर्गत यापूर्वी विद्यार्थ्यांनी ‘शालेय परसबाग’ हा प्रकल्प यशस्वी केला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात साबणनिर्मितीचा प्रकल्प हाती घेऊन विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि कौशल्य सिद्ध केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात कौशल्याधारित शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांनुसार विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सर्जनशीलता आणि स्वयंरोजगाराची मानसिकता रुजावी या हेतूने ही संकल्पना राबविण्यात आली.

विद्यालयाचे व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक दयानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कच्च्या मालापासून प्रत्यक्ष साबण तयार करणे, त्यांचे आकर्षक पॅकिंग करणे, विक्री नियोजन आणि ग्राहकांशी संवाद या सर्व व्यावसायिक घटकांचे प्रत्यक्ष धडे गिरवले. या उपक्रमातील विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांच्या हस्ते झाले. त्यांनी या प्रकल्पाला आर्थिक सहकार्य करत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होतो आणि भविष्यात स्वावलंबी बनण्याची प्रेरणा मिळते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रदर्शनाला पालकांनी प्रचंड प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी केले. या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी आणि शिक्षक-पालक संघाकडून विशेष कौतुक होत असून, ‘शिकता शिकता कमवा’ या तत्त्वाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहे.

Exit mobile version