Site icon Kokandarshan

सावंतवाडीत हॉकर्स संघटनेच्या नेतृत्वाखाली फिरत्या विक्रेत्यांनी काढला नगरपरिषदेवर मोर्चा…

आठवडा बाजार संदर्भात अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन..

सावंतवाडी,दि.०३ : शहरात भरविल्या जाणाऱ्या आठवडा बाजाराची जागा वारंवार बदलली जात असल्याने त्याचा नाहक त्रास फिरत्या विक्रेत्यांना होत आहे. आम्हाला विश्वासात न घेता हे परस्पर निर्णय घेतले जात आहेत, असा आरोप करत येथील हॉकर्स संघटनेच्या नेतृत्वाखाली फिरत्या विक्रेत्यांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला.
यावेळी ग्राहकांना सोयीचे होईल अशाच ठिकाणी आठवडा बाजाराची जागा निश्चित करा, तसेच होळीचा खुंट परिसरातील जागा गैरसोयीची आहे त्यामुळे त्या ठिकाणी बाजार हलवू नका, अशी मागणी ही त्यांच्याकडून करण्यात आली.
या मोर्चात सिंधुदुर्ग हॉकर्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, नाजिम पटेल, राजेंद्र लेंडगे, संदीप गौंड, इरसाद मालदार, सुमन वाडीकर, सुभाष चव्हाण, विजय लोके, प्रकाश वाघरी, श्रीकांत सोलापूर, विजय गुजराती, चमन सोलंकी, कलाम अंसारी, जहीर शेख, लक्ष्मण राठोड, यशवंत बेळगावकर, अर्जुन सोलंकी,शंकर चव्हाण, अर्जुन चव्हाण, सुरेश चव्हाण, माजिद शेख, धीरजू आबणावे, गुंडू चव्हाण आदींसह फिरते व्यापारी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सावंतवाडी आठवडा बाजाराची जागा आतापर्यंत चार वेळा बदलण्यात आली आहे. मात्र हे निर्णय होत असताना विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने विचारात घेतले नाही. सद्यस्थितीत तलावाकाठी भरवला जाणारा आठवडा बाजार होळीचा खुंट परिसरात नेण्यासाठीची चर्चा सुरू आहे. मात्र ती जागा ग्राहकांच्या दृष्टीने गैरसोयीची आहे.
त्या ठिकाणी वाहतुकीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तसेच व्यापाऱ्यांसाठी सुद्धा जागा अपुरी पडू शकते. त्यामुळे त्या ठिकाणी आठवडा बाजारासाठी जागा निश्चित केली जाऊ नये. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
निंबाळकर म्हणाले, राजकीय फायद्यासाठी व्यापाऱ्यांची ढाल करून नेते आठवडा बाजाराची लढाई लढत आहेत. वारंवार जागेत बदल केले जात आहे. मात्र त्या ठिकाणी कुठल्याही व्यापाऱ्याला विचारात घेतले जात नाही. हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे. या संदर्भातील सर्व चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सोमवारी भेटीसाठी बोलविले आहे. त्यावेळी त्यांनी सकारात्मक निर्णय द्यावा, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version