जगनू महाराज; सावंतवाडी येथे संत सेवालाल यांची २८४ वी जयंती उत्साहात…
सावंतवाडी,दि.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज वास्तव्यास आहे. त्यामुळे समाजाचे श्रद्धास्थान असलेला “तांडा” उभारण्यासाठी जागा आणि निधी शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी राजकीय नेत्यांकडे होणे गरजेचे आहे. त्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री जगनू महाराज यांनी आज येथे केले. दरम्यान समाजातील लोकांनी आपले पूर्वपरंपार चालत आलेले रीती रिवाज जोपासले पाहिजे. तिचं आपली समाजाची ओळख आहे. आणि तरुणांनी व्यसनाधीनता आणि मौसमजेकडे न वळता पैशाची साठवण करून स्वतःची प्रगती करावी, असा कानमंत्र ही त्यांनी यावेळी दिला. संत जय सेवालाल यांच्या २८४ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. मुरलीमनोहर चव्हाण, चराठा माजी सरपंच बाळू परब, रफिक गवंडी, दादा नगनुर, मारुती मेस्त्री, गणपत चव्हाण, विठ्ठल चव्हाण, थावरू चव्हाण, बसू चव्हाण, सोमू चव्हाण, सुभाष चव्हाण, बाबुराव वालीकार, शिवानंद राठोड, कुमार चव्हाण, कृष्णा सौदत्ती, सोमू राठोड, लक्ष्मण चव्हाण ,रामू राठोड, गणपत चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, शेखर सोमनाळ, नागेश चव्हाण, देवप्पा वालिका, बाबू चव्हाण ,गोविंद राठोड, शेखर लिंगदळी, आनंद राठोड ,परसू चव्हाण, मोतीराम चव्हाण, शिवाजी चव्हाण, सुभाष राठोड ,गुरुनाथ राठोड आदींसह मोठ्या संख्येने बंजारा समाजातील बांधव उपस्थित होते.
यावेळी जगनू महाराज पुढे म्हणाले, बंजारा समाजातील माणसे पूर्वपरंपार मेहनतीची कामे करत आली आहे. सरळ मार्गाने चालणे, गरजूंना मदत करणे, असे संत सेवालाल यांनी दिलेले अनेक कानमंत्र आजही समाजबांधव जोपासत आहेत. मात्र सद्यस्थितीत तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच समाज पुढे जाताना दिसत आहेत. त्यामुळे आपला बंजारा समाज देखील कुठे मागे पडता कामा नये. यासाठी मेहनत करता करता आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन सुशिक्षित करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील मोठ्या झालेल्या व्यक्तींचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवावा. तसे झाल्यास नक्कीच ते आपोआप स्वतःच्या यशाचा मार्ग पकडतील, असा विश्वास त्यांनी दिला. तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजातील बांधव वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचे श्रद्धास्थान असलेला तांडा या ठिकाणी नाही. तो उभारण्यासाठी या ठिकाणच्या समाज बांधवांनी एकवटून त्यासाठी जागा आणि निधी देण्याची मागणी येथील राजकीय नेत्यांच्या माध्यमातून शासनाकडे करावी, असे आवाहन त्यांनी केले. तर समाजातील तरुणांनी व्यसनाधीनता आणि मौजमजा यापासून लांब राहून आपण घाम गाळून कमावलेला पैसा साठवावा. आणि त्यातून स्वतःची प्रगती घडून आणवावी. असे प्रत्येकाने केल्यास आपला समाज कुठेही मागे पडणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात याच समाजात शिकून मोठे झालेले आणि येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मुरलीमनोहर चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. चव्हाण यांचा झालेल्या सन्मान उपस्थित युवकांनी आणि पालकांनी डोळ्यात साठवून ठेवावा. आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल करावी, असे आवाहन याप्रसंगी बोलताना डॉ. ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमात जगनू महाराज आणि डॉ. ठाकरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.