सिंधुदुर्गनगरी,दि.२६: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दिसून आला. जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय समारंभ पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर पोलीस दलाच्या वतीने शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी सिंधुदुर्गवासियांना संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी लोकशाहीच्या बळकटीकरणावर भर दिला. भारतीय लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून प्रयत्न करावेत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या विविध भागात आज दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला जिल्हयातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

