सावंतवाडी,दि.२४:दारूच्या नशेत चुकीच्या दिशेने दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याची घटना सावंतवाडीत घडली आहे. सुनील सलामवाडकर (वय ४३, राहणार- चंदगड, जि. कोल्हापूर) असे या दुचाकीस्वाराचे नाव असून, या भीषण अपघातात सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. डोक्यात हेल्मेट परिधान केलेले असल्याने सुनील याला प्राणघातक इजा झाली नाही, मात्र या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सलामवाडकर हा आपल्या दुचाकीवरून मद्यधुंद अवस्थेत रॉंग साईडने येत होता. यावेळी समोरून येणाऱ्या कारवर त्याची दुचाकी वेगाने आदळली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण केले आणि जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दारूच्या नशेत वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

