सावंतवाडी,दि.२२: कलंबिस्त व शिरशिंगे गावच्या सीमेवर वसलेल्या जागृत अशा श्री वडगणेश मंदिरात यंदाची माघी गणेश जयंती अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. या मंगल दिनानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधींना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी गणपती बाप्पाला अभिषेक घालून विशेष पूजा व आरती करण्यात आली. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी दोन्ही गावांतील तसेच परिसरातील भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
दिवसभर चाललेल्या या उत्सवात भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. स्थानिक ग्रामस्थ आणि मंदिर व्यवस्थापन समितीने अत्यंत नेटके नियोजन केल्यामुळे हा सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. निसर्गाच्या सानिध्यात आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेल्या या उत्सवामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.

