सावंतवाडी,दि.२२: माडखोल जिल्हा परिषद मतदार संघातून सांगेली-घोलेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास राऊळ यांच्या पत्नी सौ. स्नेहल किशोर कदम (OBC) (स्पृहा सुहास राऊळ) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे माडखोल मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील आणि सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
सुहास राऊळ हे सांगेली परिसरात सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. या मतदारसंघात यंदा राजकारणात एखादा ‘नवा चेहरा’ यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत होती. जनभावनेचा आदर करत त्यांनी आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुहास राऊळ म्हणाले की, “जनतेने जर आम्हाला संधी दिली आणि निवडून दिले, तर आगामी काळात माडखोल जिल्हा परिषद मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याला आमचे प्राधान्य असेल. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या उमेदवारीमुळे माडखोल मतदार संघात आता चौरंगी किंवा बहुरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मतदारांचा कौल कोणाकडे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

