Site icon Kokandarshan

इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मराठी संस्कृतीचा जागर उपक्रम प्रेरणादायी अन् आदर्शवत! : प्रा. रुपेश पाटील.

ओरोस येथील युरोकिड्स प्रीस्कूलचा ‘युरोत्सव -२०२६’ दिमाखात साजरा! 

ओरोस,दि.२१: अलीकडे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. अशावेळी आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृती आणि लोक परंपरेचा जागर इंग्रजी माध्यमाच्या युरोकिड्स प्रीस्कूल या शाळेतून होत आहे, ही बाब अत्यंत प्रेरणादायी असून इतर शाळांनीसुद्धा असे उपक्रम राबवून आजच्या काळात लोकसंस्कृतीचा जागर करावा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.

ओरोस येथील युरोकिड्स प्री स्कूलच्या वतीने आयोजित ‘युवोत्सव -२०२६’ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सव व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. रूपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अर्जुन सातोस्कर, संचालिका सौ. निता सातोस्कर, संचालक हेरंब कानडे, युरो किड्स प्री स्कूलच्या मुख्याध्यापिका निधी गोसावी, विद्यानिधी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा निर्गुण यांसह शाळा व्यवस्थापन समितीचे काशिनाथ नाईक, प्रसाद ओटवकर, शुभदा राणे, मनस्वी परब, दिपाली पाटील, सपना कांबळे, अश्विनी खोत, मेघना घाडीगांवकर, ऋचा पांगले यांसह अन्य उपस्थित होते.

दरम्यान प्रा. श्री. पाटील यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिकाऱ्यांचा जिल्हा होण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून सजग राहण्याचे आवाहन करत दहावी आणि बारावीनंतर असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दहावी आणि बारावीच्या निकालानंतरची विद्यार्थ्यांची घसरण याबद्दलही सविस्तर विवेचन केले.

दरम्यान या कार्यक्रमात प्रा. रुपेश पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विविध कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. या बक्षिस वितरण कार्यक्रमानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा महाराष्ट्राची लोक परंपरा आणि लोक संस्कृती यांचे दर्शन घडविणारा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

कार्यक्रमाचे अहवाल वाचन मुख्याध्यापिका प्रज्ञा निर्गुण यांनी केले. प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका ममता गांधी यांनी केले. तर सूत्रसंचालन विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विविध भागात विभागून केले. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग व शिक्षण प्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version