सावंतवाडी,दि.२१: तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज अत्यंत उत्साहात दाखल केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
उमेदवारी अर्ज भरताना संदीप गावडे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब, विनोद राऊळ, सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह पक्षाचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप गावडे यांच्या उमेदवारीमुळे तरुण वर्गामध्ये मोठा उत्साह दिसून येत असून कार्यकर्त्यांनी यावेळी विजयाच्या घोषणा दिल्या.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संदीप गावडे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला मी निश्चितच सार्थकी लावेन. तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि कायापालट करण्यासाठी आपण जीव ओतून काम करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या उमेदवारीमुळे मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून गावडे यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

