सावंतवाडी,दि.२१: कलंबिस्त पंचायत समिती मतदार संघातून शिरशिंगे गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देसाई यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील आणि सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्याकडे त्यांनी हा उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
यावेळी शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रशांत देसाई हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून, लोकांपर्यंत शासकीय योजना कशा पोहोचतील आणि सर्वसामान्यांना त्याचा फायदा कसा होईल, याकडे त्यांचे नेहमीच बारीक लक्ष असते. लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जनमानसामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. एक हुशार व्यक्तिमत्व आणि शांत, संयमी स्वभाव ही त्यांची ओळख असून लोकांच्या अडीअडचणीला ते त्वरित प्रतिसाद देतात.
गावात राजकारण करण्यापेक्षा एका अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्वाला पंचायत समितीमध्ये पाठवावे, असा एकमुखी ठराव काही ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे आपल्याला शिरशिंगे गावाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे प्रशांत देसाई यांनी यावेळी ‘कोकण दर्शन मीडिया’शी बोलताना सांगितले.
त्यांच्या या उमेदवारीमुळे कलंबिस्त मतदार संघातील निवडणुकीत आता रंगत वाढली आहे.

