जिमखाना मैदानाच्या सुविधांबाबत चर्चा
सावंतवाडी,दि.०९: सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रीमंत सौ. श्रद्धाराजे भोंसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नगराध्यक्षांना शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच सावंतवाडीतील ऐतिहासिक जिमखाना मैदानाच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीवेळी लखमराजे भोंसले, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मंदार नार्वेकर, सचिव बाबा खान, खजिनदार शशी देऊळकर, सदस्य राजन नाईक आणि आनंद आळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या चर्चेदरम्यान जिल्हाध्यक्ष मंदार नार्वेकर यांनी जिमखाना मैदानावर खेळाडूंना भेडसावणाऱ्या विविध समस्या नगराध्यक्षांसमोर मांडल्या. विशेषतः महिला क्रिकेटपटूंना सराव करताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव आणि मैदानाची देखभाल या विषयांवर त्यांनी विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यात क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी आणि महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी असोसिएशनच्या मागण्या सकारात्मकरीत्या ऐकून घेतल्या. जिमखाना मैदानाच्या सुधारणेसाठी आणि खेळाडूंना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नगराध्यक्षांची भेट

