सावंतवाडी, दि.०९: सोनुर्ली-निगुडे मार्गावरील रेल्वे पुलाजवळ असलेल्या ओहळावरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वारंवार मागणी करूनही या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने, सोनुर्लीचे उपसरपंच भरत गावकर यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे. येत्या आठ दिवसांत या पुलाबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास २६ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या संदर्भात उपसरपंच गावकर यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले.
दोन वर्षांपूर्वी सोनुर्ली ते निगुडे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, मात्र या मार्गावरील महत्त्वाच्या पुलाचे काम अद्याप प्रलंबित आहे. सध्या हा पूल पूर्णतः कमकुवत झाला असून गेल्या पावसाळ्यात या पुलाची संरक्षण भिंतही कोसळली होती. आगामी पावसाळ्यापूर्वी या पुलाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती न झाल्यास हा पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा मार्ग स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जर हा पूल कोसळला तर या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल, ज्याचा मोठा फटका शेतीकामांना आणि दैनंदिन व्यवहारांना बसणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळत असल्याचा आरोप गावकर यांनी केला आहे.
“प्रशासकीय दिरंगाईमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर येत्या आठ दिवसांत कामाला सुरुवात झाली नाही, तर प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर मी उपोषणाला बसणार आहे. या काळात माझ्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची राहील,” असा कडक इशारा भरत गावकर यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
या इशाऱ्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय पावले उचलणार, याकडे सोनुर्ली आणि निगुडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

