सावंतवाडी,दि.०४: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आज सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या पत्रादेवी येथे ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर कोकणात परतलेल्या राणे यांच्या स्वागतासाठी हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जनसागर लोटला होता.
यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचे जंगी स्वागत केले. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.
संपूर्ण पत्रादेवी परिसर ढोल-ताशांच्या गजराने आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दणाणून गेला होता. नारायण राणे यांचे आगमन होताच त्यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. “कोकणचा वाघ आला”, “राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” आणि “हमारा नेता कैसा हो, नारायण राणे जैसा हो” अशा बुलंद घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर डोक्यावर घेतला होता. केवळ नारायण राणेच नव्हे, तर पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या समर्थनाार्थही कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांमधील हा अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोष आगामी राजकीय वातावरणाची नांदी ठरणारा असल्याचे यावेळी दिसून आले.

