सावंतवाडी,दि.०१: तालुक्यातील वेर्ले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. सटवाडी येथील नियोजित कामाचे भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक रविंद्र मडगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, वेर्ले गावाच्या सरपंच सौ. रुचिता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ आणि माजी उपसरपंच सुभाष राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सटवाडी येथील मुख्य कामासोबतच ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वेर्ले-जेंगाटवाडी आणि गावठाणवाडी येथील रस्ते कामांचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यामुळे परिसरातील अनेक वर्षांचा रस्त्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या सोहळ्याला भगवान राणे, प्रसाद गावडे, राजेंद्र राऊळ, दिलीप राऊळ, शिवराम राऊळ, सुनील राऊळ, अनंत राऊळ, गोविंद राऊळ, तुकाराम बिडये यांच्यासह गावातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि कामाला गती दिल्याबद्दल यावेळी ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

