Site icon Kokandarshan

सांगेलीत युवा विकास प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन

सावंतवाडी,दि.२९: रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सांगेली येथील ‘युवा विकास प्रतिष्ठान’ या संस्थेला १० वर्षे पूर्ण होत आहेत. या दशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने येत्या रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिर आणि रक्तदात्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या १० वर्षांपासून युवा विकास प्रतिष्ठान रक्तदानाच्या क्षेत्रात सातत्याने सक्रिय असून, अनेक गरजू रुग्णांना जीवदान देण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. आपल्या या गौरवशाली प्रवासाचे दशक पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम सांगेली येथील केंद्रशाळा सांगेली येथे पार पडणार आहे.
याप्रसंगी रक्तदान शिबिरासोबतच, ज्या रक्तदात्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे, त्यांचा यथोचित सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.

युवा विकास प्रतिष्ठानने या विधायक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन परिसरातील नागरिक आणि रक्तदात्यांना केले आहे. ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश समाजात पोहचवण्यासाठी हा सोहळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Exit mobile version