शिरोडा,दि.२७: “समाजाचे हित साधणारे साहित्य हेच खरे साहित्य असते. त्यामुळे सामाजिक ताणतणाव कमी करणारे आणि समाजमनाचे प्रतिबिंब ज्यामध्ये उमटेल, अशा साहित्याची निर्मिती व्हायला हवी,” असे प्रतिपादन कल्याण येथील नामवंत साहित्यिक प्रवीण देशमुख यांनी केले. शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने आणि आजगावच्या ‘साहित्य प्रेरणा कट्ट्या’च्या वतीने आयोजित ‘प्रेरणा साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
वि. स. खांडेकर सभागृहात रंगलेल्या या संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष भालचंद्र जोशी, समन्वयक कवी विनय सौदागर, ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष भाई मंत्री आणि कार्यवाह सचिन गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गायक शेखर पणशीकर यांच्या गीताने झाली. स्वागताध्यक्ष भालचंद्र जोशी यांनी वाचनाची आवड आणि ग्रंथसंग्रहाचे महत्त्व विशद केले, तर भाई मंत्री यांनी अशा विधायक उपक्रमांना नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
विविध सत्रांची मेजवानी संमेलनात ‘साहित्यिक संस्थांचे सामाजिक स्वास्थ्यात योगदान’ या विषयावर परिसंवाद पार पडला. यामध्ये प्रीतम ओगले आणि मंगेश मसके यांनी विचार मांडले, तर प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी या सत्राचे अध्यक्षपद भूषवले. दुपारच्या सत्रात कवयित्री अपर्णा प्रभू परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कविसंमेलनात १५ हून अधिक कवींनी आपल्या रचना सादर केल्या. “कवींनी लेखनासोबतच सादरीकरणाचे तंत्र आणि भाषेचे भान राखणे आवश्यक आहे,” असा मोलाचा सल्ला परांजपे यांनी यावेळी दिला.
दिग्गजांचे स्मरण आणि गौरव यंदाचे वर्ष रवींद्र पिंगे, शंकर बाबाजी पाटील आणि शंकर खंडू पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने ‘स्मरण रवी-शंकरांचे’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विनय सौदागर, प्रा. नीलम कांबळे, प्रा. मानसी शेट मांद्रेकर आणि रवींद्र पणशीकर यांनी या दिग्गज साहित्यिकांच्या साहित्याचा आढावा घेत अभिवाचन केले.
समारोप सत्रात गोगटे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यश मिळवलेल्या रोहित आसोलकर याचा विशेष गौरव करण्यात आला. संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम दीक्षित यांनी केले, तर विनय सौदागर, सरोज रेडकर व प्राची पालयेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी काशिनाथ मेस्त्री, हर्षदा बागायतकर आणि रवींद्र पणशीकर यांनी ‘एकच प्याला’ या नाटकातील प्रवेश सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याला डॉ. सुधाकर ठाकूर, बाळकृष्ण राणे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

