Site icon Kokandarshan

‘संत नामदेव’ संगीत नाटकाच्या प्रयोगाने आज धवडकीत दत्त जयंती उत्सव रंगणार..!

सावंतवाडी,दि.०४: श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील धवडकी येथील श्री दत्त मंदिर येथे आज गुरुवार, दिनांक ०४ डिसेंबर २०२५ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ‘संत नामदेव’ हे दोन अंकी संगीत नाटक असणार आहे.
श्री दत्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून, श्री दत्त प्रासादिक नाट्यमंडळ, धवडकी यांच्या वतीने वारकरी संप्रदायाचे थोर संत नामदेव महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘संत नामदेव’ या संगीत नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
या नाटकाचे लेखन आर. बी. फडते यांनी केले. तर नाटकाचे दिग्दर्शन अंकुश सांगेलकर सर यांनी केले आहे.
या नाटकात धवडकी येथील स्थानिक आणि अनुभवी कलाकारांचा सहभाग असणार आहे, तसेच बाल कलाकारांनाही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये संधी देण्यात आली आहे.
या मध्ये कलाकार: दत्ताराम परब, अनंत सावंत, गोविंद परब, कृष्णा महाडेश्वर, गोविंद सावंत, विकास महाडेश्वर आणि अनिल बंड हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
बाल कलाकारांमध्ये धैर्य कोळमेकर, लिखित बंड, आत्माराम राऊळ, रुद्र परब आणि सुरभि राऊळ यांचा समावेश आहे.
विशेषतः संत जनाबाईंची महत्त्वपूर्ण भूमिका कुडाळ येथील कु. तन्वी मराठे ही बाल कलाकार साकारणार आहे.
नाटकाला साजेसे संगीत देण्यासाठी अनुभवी वादक साथ देणार आहेत. हार्मोनियमवर संदेश बांदेलकर (कुडाळ) आणि तबल्यावर भाऊ तुळसकर (तुळस) हे साथ संगत करतील.

श्री दत्त जयंती उत्सव आणि ‘संत नामदेव’ या संगीत नाटकाचा प्रयोग धवडकी येथील श्री दत्त मंदिरात होणार आहे. या नाट्यप्रयोगातून संत नामदेवांच्या भक्तिमय आणि प्रेरणादायी जीवनाचा परिचय घडणार असल्याने, परिसरातील सर्व भाविक आणि नाट्यप्रेमींनी उपस्थित राहून या उत्सवाचा आणि प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त प्रासादिक नाट्यमंडळ, धवडकी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version