मुंबई,दि.०२: नगरपरिषद निवडणुकांच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. जी मतमोजणी प्रक्रिया उद्या म्हणजेच ३ डिसेंबर रोजी होणार होती, ती आता २१ डिसेंबर या दिवशी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंबंधीचे आदेश दिल्यानंतर ही मतमोजणी प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचिकेमध्ये अशी मागणी करण्यात आली होती की, जर काही नगरपरिषदांचे निकाल आधी जाहीर झाले, तर त्याचा परिणाम उर्वरित २० नगरपरिषदांच्या निकालावर होऊ शकतो. अशा प्रकारे निकालाच्या ट्रेंडचा आणि वातावरणाचा प्रभाव पडावा नये, तसेच सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी आणि समान वातावरणात जाहीर व्हावेत, या उद्देशाने ही मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे.
या निर्णयामुळे, मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी, आता नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या सर्व उमेदवार आणि मतदारांना निकालासाठी २१ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

