Site icon Kokandarshan

कोकणचे पहिले सैनिक स्कूल: ‘भोसले सैनिक स्कूल’, सावंतवाडीला अधिकृत मान्यता!

उद्या ९ नोव्हेंबर इटरन्स इक्झामची शेवटची तारीख

सावंतवाडी,दि.०८: संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली यांच्या सहकार्यातून श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोसले सैनिक स्कूल’ या शाळेला नुकतीच अधिकृत मान्यता मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण मान्यतेमुळे कोकणातील पहिले सैनिक स्कूल उभारले जात असून, ते चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात साकारले जाणार आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी भोंसले सैनिक स्कूलचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर लेफ्ट. कर्नल रत्नेश सिन्हा आणि जनसंपर्क अधिकारी नितिन सांडये आदी उपस्थित होते.

श्री. भोंसले यांनी सांगितले की, सध्या देशभरात ३३ सैनिक स्कूल्स कार्यरत आहेत. केंद्र सरकारने सैनिकी शिक्षणाच्या वाढत्या मागणीचा विचार करून Public Private Partnership (PPP) मॉडेलवर ६९ नवीन सैनिक स्कूल्सना मान्यता दिली आहे. ‘भोसले सैनिक स्कूल’ हे कोकण विभागातील भारत सरकार मान्यता प्राप्त पहिले सैनिक स्कूल ठरले आहे.

“ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे सैनिकी शिक्षण स्थानिक स्तरावर मिळावे, हा या शाळेचा मुख्य हेतू आहे,” असे श्री. भोंसले यांनी स्पष्ट केले.

येथे आधुनिक शिक्षणासोबतच सैनिकी प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम साधला जाणार आहे.

प्रवेश प्रक्रिया शाळेत प्रवेश AISSEE (All India Sainik School Entrance Examination) परीक्षेद्वारे घेतला जाईल.

प्रवेश वर्ग: दरवर्षी सहावी आणि नववी इयत्तेत प्रवेश दिला जाईल.
शाळेची एकूण प्रवेश क्षमता १६० विद्यार्थ्यांची असून, त्यापैकी ४० जागा विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
या आरक्षणामुळे भोसले सैनिक स्कूल हे कोकणातील पहिले सहशिक्षणात्मक सैनिक स्कूल ठरणार आहे. विद्यार्थिनींसाठी असलेला हा कोटा महिला सबलीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल.
या शाळेमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा आणि कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज उरणार नाही. स्थानिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे निवासी शिक्षण आणि सैनिकी प्रशिक्षण मिळेल, ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि इतर संरक्षण सेवांमध्ये प्रवेश मिळण्याच्या संधी वाढतील.
भोसले सैनिक स्कूलचा कॅम्पस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केला जात आहे. यात शैक्षणिक इमारती, ट्रेनिंग ब्लॉक्स, हॉस्टेल्स, ड्रिल ग्राउंड, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इत्यादींची उभारणी सुरू आहे.
शाळेच्या स्थापनेचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे, त्यानंतर औपचारिक प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
लेफ्ट. कर्नल रत्नेश सिन्हा यांनी ‘भोसले सैनिक स्कूल’ हे केवळ एक शैक्षणिक केंद्र नसून, “भविष्यातील सैन्य अधिकारी आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे ध्येयस्थान” असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन केले की, इटरन्स इक्झामची शेवटची तारीख उद्या, ९ नोव्हेंबर आहे.

Exit mobile version