राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण, ऑलिम्पिकसाठीही निवड
सावंतवाडी,दि.२९: नागपूर येथे झालेल्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने सुवर्णपदक पटकावले आहे. या देदीप्यमान विजयामुळे त्याची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली असून, विशेष म्हणजे त्याची राज्यातून ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालयाच्या वतीने दि. २७ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आयुषने ४०० पैकी ३७९ गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक मिळवला.
आयुषची सातत्यपूर्ण कामगिरी आयुषचे हे यश पहिलेच नाही. तो गेली तीन वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने भाग घेत आहे. गतवर्षी त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘गुणवंत खेळाडू’ पुरस्कारही मिळाला होता. मागील वर्षी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने ४०० पैकी ३७८ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले होते. तसेच, या वर्षीच्या विभागीय स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक प्राप्त केले होते.
या यशामागे त्याचे वडील दत्तप्रसाद यांचे परिश्रम आणि सावंतवाडी येथील उपरकर शूटिंगच्या कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावणाऱ्या या घवघवीत यशाबद्दल आयुषचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आयुषचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

