Site icon Kokandarshan

कोलगाव जिल्हा परिषद मध्ये भाजपची मोर्चेबांधणी; कारीवडे पंचायत समिती मतदार संघात पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा

सावंतवाडी,दि.२३: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (भाजप) कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आपली ताकद एकवटण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून, कारीवडे पंचायत समिती मतदार संघातील कारीवडे, कुणकेरी आणि आंबेगाव या गावांमधील भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी, २२ ऑक्टोबर रोजी कारीवडे येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि पक्षाच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी आगामी निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “केंद्र आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू आहे. हा विकासाचा वेग स्थानिक पातळीवर पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये भाजपची सत्ता असणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे व पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवावेत.”

बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसाठी बूथ स्तरावर नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक बूथवर जाऊन बैठका घेणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर पक्ष जो उमेदवार देईल, त्याला एकदिलाने आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार सर्वानुमते या बैठकीत करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीस मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आरीवडेकर, माजी नगरसेवक परिमल नाईक, मंडल उपाध्यक्ष अशोक माळकर, प्रमोद सावंत, कारीवडे सरपंच, आंबेगाव सरपंच, कुणकेरी उपसरपंच सुनील परब, शक्ती केंद्रप्रमुख आनंद तळवणेकर, कुणकेरी शक्ती केंद्रप्रमुख कृष्णा उर्फ बाळा सावंत, महिला मंडल अध्यक्षा सौ. प्राजक्ता केळुस्कर, केशव साहिल, बाळा गावकर, विविध विकास संस्थांचे चेअरमन, सर्व बूथ अध्यक्ष आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, जिल्हा परिषद मतदार संघात निवडणुक जिंकण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे.

Exit mobile version