सावंतवाडी, दि. १८: कोकणातील स्थानिक उद्योजक आणि बचतगटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५’ चे आज शानदार उद्घाटन झाले. ज्येष्ठ लोककलावंत आणि पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांच्या हस्ते फित कापून या भव्य प्रदर्शनी व विक्री महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.
भाजपा युवा नेते विशाल परब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ‘मेक इन कोकण’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला चालना देण्याचा निर्धार केला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील बचतगटांपासून ते सर्वच क्षेत्रांतील उद्योजकांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक बेरोजगारांना व्यावसायिक दिशा देण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कोकणाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सावंतवाडी भाजप मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, महिला मंडळ अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, माजी नगरसेविका सौ. दीपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी विशाल परब यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

