Site icon Kokandarshan

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर. पी. डी. कॉलेजचा दबदबा; रेश्मा पालव आणि आर्या राणे यांची चमकदार कामगिरी

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक

सावंतवाडी,दि.१७: ‘जागतिक आपत्ती धोके निवारण दिना’चे औचित्य साधून सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित ‘आपत्ती व्यवस्थापन व लोकसहभाग’ या विषयावरील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. कुमारी रेश्मा पालवने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर कुमारी आर्या राणे हिने द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरले.

संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या ‘जागतिक आपत्ती धोके निवारण दिना’निमित्त जिल्हा परिषद, सिंधुदुर्गच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या आदेशानुसार, तालुकास्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता, मात्र आर. पी. डी. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने सर्वांची मने जिंकली.

विजेत्या कुमारी रेश्मा पालव हिला रोख रक्कम ३,००० रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेल्या कुमारी आर्या राणे हिला रोख रक्कम २,००० रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी कार्यालय, सावंतवाडी येथे हा गौरव सोहळा संपन्न झाला.

या शानदार यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक संजय पाटील आणि उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या यशामागे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व विषय शिक्षकांचेही मुख्याध्यापकांनी विशेष कौतुक केले. या निकालामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Exit mobile version