सावंतवाडी,दि.१३: आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी तालुक्यातील पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत आज प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीमध्ये सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, तळवडे पंचायत समितीच्या महिला सदस्याला सभापती होण्याची संधी मिळणार आहे. या सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर काहींचे पत्ते कट झाले आहेत.
तहसीलदार कार्यालयात झालेल्या या आरक्षण सोडत कार्यक्रमामुळे निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. संपूर्ण सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडली. तशुषी जाधव आणि भक्ती मुळीक या लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.
आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहीर झालेले सविस्तर आरक्षण खालीलप्रमाणे:
सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): कलंबिस्त, आंबोली, मळगाव, माजगाव, न्हावेली, इन्सुली, सातार्डा.
सर्वसाधारण (महिला): माडखोल, कारिवडे, चराठे, मळेवाड, बांदा, तांबोळी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): कोलगाव, आरोंदा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग: विलवडे, शेर्ले.
अनुसूचित जाती (महिला): तळवडे.
या सोडतीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, सभापती पदाचा चेहरा तळवडेत ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष तिकडे लागले आहे.

