सावंतवाडी,दि.११: तालुक्यातील वेर्ले समता नगर आणि राणेवाडी यांना जोडणारा महत्त्वाचा पूल शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचून कोसळला. या घटनेमुळे परिसरातील शाळकरी मुले आणि ग्रामस्थांचा संपर्क तुटला असून, त्यांना दैनंदिन कामकाजासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाचा काही भाग खचला आणि अखेरीस तो कोसळला. हा पूल वर्ले समता नगर आणि राणेवाडी या भागांना जोडणारा मुख्य दुवा होता. दररोज शेकडो ग्रामस्थ आणि विद्यार्थी याचा वापर करत असत. पूल कोसळल्याने आता त्यांना अनेक किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. विशेषतः शाळकरी मुलांचे मोठे हाल होत आहेत.
याबाबत बोलताना वर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. आनंद राऊळ यांनी सांगितले की, “शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला आहे. यामुळे ग्रामस्थ आणि विशेषतः शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत आहे. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे,” अशी मागणी श्री. राऊळ यांनी केली आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

