सावंतवाडी,दि.५: स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत ‘घर तेथे शोषखड्डा’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा सावंतवाडी तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत हद्दीतील मळेवाड माळकरटेंब येथे रहिवासी अनिल नाईक यांच्या परसबागेत शोषखड्ड्याची खोदाई करून पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा श्रीफळ वाढवून प्रारंभ झाला.
सध्या राज्यभरात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने स्वच्छता, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या विषयांवर आधारित विविध उपक्रम शासनाकडून आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘घर तेथे शोषखड्डा’ अभियान सुरू करण्यात आले असून, सावंतवाडी तालुक्यात याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीने हे अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी मळेवाड कोंडुरेचे सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक आणि मधुकर जाधव, रोजगार सेवक अमित नाईक, ग्रामपंचायत अधिकारी भालचंद्र सावंत, वैभव मोरुडकर यांच्यासह अंगणवाडी सेविका, सी.आर.पी., ग्रामस्थ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

