सावंतवाडी,दि.३०: एकेकाळी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला सेवा पुरवणारे आणि राज्यामध्ये सर्वाधिक निधी मिळवून देणारे सावंतवाडी येथील बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्र आज अत्यंत बिकट अवस्थेत आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या महत्त्वाच्या केंद्राची अक्षरशः “तीनतेरा” वाजली असून, मोडकळीस आलेली इमारत आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे ग्राहकसेवेचा बोजवारा उडाला आहे.
या केंद्राच्या इमारतीचा स्लॅब उखडला असून तो कधीही कोसळण्याच्या धोकादायक स्थितीत आहे. या गंभीर समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे. इतकेच नव्हे तर, केंद्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून, त्यांची मुळे थेट इमारतीच्या भिंतींमध्ये शिरल्याने भिंतींनाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
एकेकाळी हजारो ग्राहकांना तत्पर सेवा देणाऱ्या या केंद्राचा संपूर्ण भार आज केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर आहे. कर्मचारी संख्या अपुरी असल्याने ग्राहकांना नवीन कनेक्शन घेणे, बिल भरणे किंवा तक्रारींचे निवारण करणे अशा कामांसाठी तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. ग्राहकांच्या समस्यांची समाधानकारक दखल घेतली जात नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“ज्या केंद्रातून बीएसएनएलला इतका मोठा महसूल मिळतो, त्याच केंद्राची अशी दुरवस्था पाहणे अत्यंत निराशाजनक आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक ग्राहकाने दिली. “आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी येथे कोणीही जबाबदार अधिकारी नाही. एका कर्मचाऱ्याने किती आणि काय काय सांभाळायचे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष घालून ग्राहक केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती करावी आणि ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्गाची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी आता ग्राहकवर्गातून जोर धरू लागली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास बीएसएनएलला आपला विश्वासू ग्राहक गमवावा लागेल, हे निश्चित.

