Site icon Kokandarshan

सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष

पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.. व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग संघटनेची मागणी

सिंधुदुर्ग,दि.२९ : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर समाजकंटकांकडून होणारे हल्ले आणि धमक्यांच्या वाढत्या घटनांनी सिंधुदुर्गातील पत्रकारिता क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक येथील पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनेनंतर, सिंधुदुर्गातील ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे आणि कुडाळचे पत्रकार चिन्मय घोगळे यांना आलेल्या धमक्यांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेने आक्रमक भूमिका घेत आज जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांना निवेदन सादर करून पत्रकारांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे बातमीदारीसाठी गेलेले पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे यांच्यावर गुंडांनी केलेला जीवघेणा हल्ला हा लोकशाहीवरचा थेट हल्ला आहे. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांवर प्रकाश टाकणाऱ्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे.

ही घटना ताजी असतानाच, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक आणि सिंधुदुर्गातील निर्भीड पत्रकार सीताराम गावडे यांना मोबाईल फोनवरून धमक्या देण्यात आल्या. गावडे हे जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू, मटका, जुगार आणि ड्रग्स यांसारख्या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. प्रशासनाच्या कामाला एकप्रकारे मदतच करणाऱ्या पत्रकाराला अशाप्रकारे धमकावणे आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.

त्याचबरोबर, कुडाळ येथील पत्रकार चिन्मय घोगळे यांनी वाळू तस्करी विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याने त्यांनाही सोशल मीडियावरून धमक्यांचे संदेश येत आहेत. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील पत्रकार असुरक्षिततेच्या भावनेखाली काम करत असून, या घटनांची वस्तुनिष्ठ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकारांना निर्भीडपणे काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने केली आहे.

यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे सचिव शैलेश मयेकर, कार्याध्यक्ष अनंत धोंड, कार्याध्यक्ष भूषण सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष आप्पा राणे, कुडाळ तालुकाध्यक्ष चिन्मय घोगळे, प्रसिद्धी प्रमुख दीपक पटेकर, प्रतीक राणे, साबाजी परब, प्रथमेश गवस यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.

दरम्यान, शिष्टमंडळाने जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे रोप देऊन स्वागत केले आणि त्यांच्याकडून या प्रकरणात योग्य न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा आता जिल्ह्यातील पत्रकार बाळगून आहेत.

Exit mobile version