सावंतवाडी,दि. २६: सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी विक्रांत सावंत यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना, श्री. सावंत यांच्यासारखे कार्यक्षम सहकारी शिक्षण क्षेत्रात मोठ्या पदावर येत असल्याने, भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती घडेल, असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.
विक्रांत सावंत यांच्या निवडीनिमित्त आयोजित सदिच्छा भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री राणे यांनी शिक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “शिक्षण क्षेत्रात ‘एआय’ च्या माध्यमातून विविध प्रयोग यशस्वी होत आहेत. आज अमेरिकेतील शिक्षक सिंधुदुर्गातील मुलांना शिकवू शकेल, अशी प्रगत यंत्रणा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ‘एआय’ अनेक नवनवीन मार्ग खुले करून देत आहे. आम्ही जिल्हा आणि राज्य पातळीवर या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करत आहोत.”
श्री. सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडतील आणि ‘एआय’ सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा मार्ग अधिक सुकर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

