Site icon Kokandarshan

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात संपन्न

देवगडचे श्रीपाद कुलकर्णी ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

सावंतवाडी, दि. २६: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ विविध उपक्रमांनी आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने देवगड येथील ज्येष्ठ फार्मासिस्ट श्रीपाद कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबाच्या सात दशकांहून अधिक काळाच्या प्रामाणिक सेवेचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) शशिकांत यादव उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “औषध हे जीवन वाचवणारा घटक आहे. त्यामुळे फार्मासिस्टने कोणताही शॉर्टकट न अवलंबता उच्च शिक्षण घेऊन या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे.” त्यांनी भारतीय औषध उद्योगाच्या प्रगतीचा आढावा घेत फार्मासिस्टच्या जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले.

पुरस्काराला उत्तर देताना श्रीपाद कुलकर्णी म्हणाले, “सचोटी, प्रामाणिकपणा आणि शिस्त हे गुण फार्मासिस्टसाठी अत्यावश्यक आहेत. ग्रामीण भागात जिथे वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडतात, तिथे फार्मासिस्ट हा उपचाराचा महत्त्वाचा दुवा असतो. लोकांचा विश्वास हाच खरा सन्मान असून, हा पुरस्कार आमच्या कुटुंबाने केलेल्या प्रामाणिक सेवेचे फळ आहे.”

सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून संघटना आणि कॉलेज संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. कॉलेजचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांसमोर आदर्श फार्मासिस्टचा वस्तुपाठ ठेवणे आणि त्यांना प्रेरणा देणे, हा या पुरस्काराचा मुख्य हेतू आहे.”

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सत्यजित साठे यांनी भारताच्या जागतिक औषधनिर्माण क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. कॉलेजच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फार्मा लोगो, फार्मा स्लोगन आणि फार्मा रांगोळी यांसारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत-भोसले, श्रीपाद कुलकर्णी यांच्या पत्नी व नात, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, विनायक दळवी, संतोष राणे, अमर गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अंकिता नेवगी व डॉ. प्रशांत माळी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. गौरी भिवशेठ यांनी केले.

Exit mobile version