सावंतवाडी, दि.२५: माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे नातू आणि काँग्रेस नेते कै. विकासभाई सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांची शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नुकतेच विकासभाई सावंत यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक घेण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आरपीडी हायस्कूल, चौकुळ हायस्कुल, दोडामार्ग हायस्कुल तसेच शांतिनिकेतन विद्यालय आणि जे.बी. नाईक महाविद्यालय अशा के.जी. ते पी.जी. पर्यंत शिक्षण देणाऱ्या आणि सुमारे साडेचार हजार विद्यार्थी असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आता विक्रांत सावंत सांभाळणार आहेत.
आपल्या निवडीनंतर बोलताना विक्रांत सावंत यांनी, माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत हे आजोबा आणि वडील कै. विकासभाई सावंत यांचा आदर्श माझ्या मनात आहे. या संस्थेचा वटवृक्ष बनवणाऱ्या कै. प्रतापराव भोसले, कै. जे.बी. नाईक, कै. बी.एस. नाईक यांसारख्या सर्व महनीय व्यक्तींचा आदर्श घेऊन मी वाटचाल करणार आहे, असे सांगितले. संस्थेची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची संधी मिळाली, याचा सदुपयोग करणार असल्याचेही ते म्हणाले.
माझे आजोबा आणि वडील यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाला स्मरून, विद्यार्थ्यांच्या यशासाठी व संस्थेचे नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे विक्रांत सावंत यांनी सांगितले.
या बैठकीला संस्थेचे उपाध्यक्ष
डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही.बी. नाईक, खजिनदार सी.एल. नाईक, सदस्य अमोल सावंत, चंद्रकांत सावंत, संदीप राणे, सतिश बागवे, सौ. वसुधा मुळीक, सौ. छाया सावंत, सौ. स्नेहा परब आदी उपस्थित होते.
या निवडीनंतर विक्रांत सावंत यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. सुहास सावंत, ॲड. शाम सावंत काका मांजरेकर, संजय कानसे, रवींद्र म्हापसेकर, जगदीश धोंड, राजू राणे, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, संदीप सुकी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी विक्रांत सावंत यांची बिनविरोध निवड

