Site icon Kokandarshan

सिंधुदुर्गाचा विकास – बॅनरवर की जमिनीवर…?


प्रगती फलकांवर, सुविधा व्हेंटिलेटरवर!

संपादकीय ,अनंत (आनंद) धोंड, दि.२०: सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि साध्या-भोळ्या माणसांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र, या बाह्य सौंदर्याच्या मागे मूलभूत सुविधांची एक विदारक वास्तुकथा दडलेली आहे. आज जिल्ह्याच्या कोणत्याही शहरात किंवा खेडोपाडी नजर टाकल्यास मोठमोठे बॅनर्स, होर्डिंग्ज आपले स्वागत करतात. ‘मी आमदार झालो तर…’, ‘मंत्रीपदी आल्यावर हे करणार, ते करणार…’ अशा आकर्षक घोषणा आणि आश्वासनांनी हे बॅनर्स रंगलेले दिसतात. नेतेमंडळी स्वतःची पाठ थोपटून घेत विकासाच्या गप्पा मारतात, पण हा तथाकथित विकास जमिनीवर न उतरता केवळ याच चकचकीत फलकांवर अडकून पडला आहे, हे दुर्दैव.

आज जिल्ह्याची परिस्थिती पाहता ‘विकास’ हा शब्दच जणू चेष्टेचा विषय बनला आहे. ज्या आरोग्यसेवेवर सर्वसामान्यांचे जीवन अवलंबून आहे, तीच आज ‘व्हेंटिलेटर’वर आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था बिकट आहे, तर जिल्हा रुग्णालयांमध्ये महत्त्वाच्या सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला वेळेवर उपचार मिळवण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यात किंवा गोवा-मुंबईकडे धाव घ्यावी लागते. रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे चुकवताना होणारे अपघात आणि खराब रस्त्यांमुळे होणारे वेळेचे व पैशाचे नुकसान हे येथील जनतेच्या नशिबी आले आहे. या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच! त्यातच विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. अघोषित भारनियमनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची कामे आणि लहान-मोठ्या उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे.

एकीकडे जनतेचा हा रोजचा संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे नेतेमंडळी मात्र या गंभीर प्रश्नांवर मूग गिळून गप्प आहेत. त्यांचे लक्ष केवळ स्व-प्रसिद्धी आणि बॅनरबाजीच्या राजकारणात लागलेले दिसते. निवडणुका जवळ आल्या की आश्वासनांचा पाऊस पाडला जातो, विकासाच्या पोकळ वल्गना केल्या जातात. मात्र, एकदा का निवडणूक संपली की दिलेली आश्वासने आणि जनतेच्या समस्या दोन्ही वाऱ्यावर सोडून दिल्या जातात. प्रश्न असा पडतो की, ज्या नेत्यांना आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत गरजांची जाणीव नाही, ते जिल्ह्याच्या विकासाचा भव्य आराखडा कसा काय मांडू शकतात? ज्यांना रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत, त्यांना विकासाचा महामार्ग कसा दिसणार?

आता वेळ आली आहे ती आगामी निवडणुकांमध्ये सिंधुदुर्गातील सुज्ञ जनतेने जागे होण्याची. नेत्यांच्या चकचकीत बॅनरबाजीला आणि पोकळ आश्वासनांना भुलण्याची चूक आता महागात पडू शकते. पैशाच्या किंवा कोणत्याही अमिषाला बळी न पडता, प्रामाणिकपणे विचार करणे आवश्यक आहे. आपला उमेदवार कोण आहे? त्याची आजवरची कामगिरी काय आहे? त्याला मतदारसंघातील समस्यांची खरोखर जाणीव आहे का? की तो केवळ निवडणुकीपुरता मतांचा जोगवा मागायला आला आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत.

सिंधुदुर्गाचे भवितव्य नेत्यांच्या बॅनरवर नाही, तर सामान्य माणसाच्या मतदानात आहे. जर जनतेने योग्य आणि कर्तृत्ववान उमेदवाराला निवडून दिले, तरच आरोग्यसेवा, वीज आणि रस्त्यांसारख्या मूलभूत गरजा पूर्णत्वास जातील. अन्यथा, विकासाच्या वल्गना बॅनरवर चमकत राहतील आणि सामान्य जनता मात्र अंधारातच चाचपडत राहील. निर्णय आता जनतेच्या हातात आहे.

Exit mobile version