पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते विशाल परब यांचा अभिनव उपक्रम
सावंतवाडी, दि.१८: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होत असलेल्या ‘सेवा-सुशासन पंधरवड्या’ अंतर्गत, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि उद्योजक विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एक अभिनव आरोग्य उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, “आरोग्याची वारी, जनतेच्या दारी” या संकल्पने अंतर्गत एका फिरत्या डिजिटल दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला त्यांच्या दारातच मोफत आणि आधुनिक आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
हा फिरता दवाखाना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असून, त्याद्वारे १०० पेक्षा अधिक प्रकारच्या आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. यामध्ये संपूर्ण शरीर तपासणी, हिमोग्लोबिन, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, हृदय तपासणी (ECG), ऑक्सिजन पातळी, युरिन टेस्ट आणि शरीराचे तापमान यांसारख्या अनेक महत्त्वाच्या चाचण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट अवघ्या पाच ते दहा मिनिटांत रुग्णांना मिळणार आहेत, ज्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार करणे शक्य होणार आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना विशाल परब म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाने माझी ही संकल्पना प्रत्यक्षात येत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. कोकणातील जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यरत झालो आहे. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित राहावे, या ध्येयाने भविष्यात सावंतवाडीमध्ये गोरगरिबांना परवडणारे एक अद्ययावत मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा माझा संकल्प आहे. आजचा हा फिरता दवाखाना त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
या डिजिटल फिरत्या दवाखान्यामुळे केवळ तात्काळ आरोग्य तपासणीच होणार नाही, तर लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशाल परब यांच्या या सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या हिताच्या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भाजपा नेते विशाल परब यांच्यासमवेत ॲड. अनिल निरवडेकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, उपाध्यक्ष गुरुदत्त कल्याणकर, शक्ती केंद्र प्रमुख जयेश सावंत, सरपंच संजय डिंगणेकर, उपसरपंच शैलजा नाडकर्णी, रंगनाथ गवस, आदेश सावंत यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

