सावंतवाडी,दि.१५: “शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी दिल्यानंतर मी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. माझ्याकडे असलेल्या महसूल, ग्रामविकास, अन्न नागरी पुरवठा व अन्न औषध प्रशासन या चारही खात्यांचा तालुकानिहाय आढावा घेणार असून, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माझा अधिक भर राहील,” असा विश्वास राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज येथे व्यक्त केला.
मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री कदम म्हणाले, “महसूल आणि ग्रामविकास ही दोन्ही खाती थेट ग्रामीण जनतेशी निगडीत आहेत. या खात्यांसोबतच इतर दोन खात्यांचा आढावा घेऊन स्थानिक प्रश्न सोडवण्याला माझे प्राधान्य असेल. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारीनंतर येथील शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हातभार लावण्यासाठी मी आलो आहे. एक मंत्री म्हणून शिवसैनिकांचे प्रश्न सोडवण्यावरही माझा भर असेल.” केसरकर यांच्या अनुभवाचा फायदा घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्ह्यातील वाळू चोरीच्या गंभीर प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “वाळू चोरी रोखण्यासाठी ‘क्रश सॅन्ड’ हा एक उत्तम पर्याय आहे. नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी अधिकारी का करत नाहीत आणि आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली गेली आहे, याचाही सविस्तर आढावा घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी आंबोली, चौकुळ आणि गेळे येथील जमिनीच्या प्रश्नावर भाष्य केले. “या भागातील महसूल विभागाचा प्रश्न सुटला असून, केवळ वन खात्याचा प्रश्न शिल्लक आहे. त्यावर वरिष्ठ पातळीवर काम सुरू असून तो लवकरच मार्गी लागेल,” असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार केसरकर यांच्या हस्ते राज्यमंत्री योगेश कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, उपनेते संजय आंग्रे, अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, युवा नेते दिनेश गावडे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई,झेवियर फर्नांडिस,यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

