Site icon Kokandarshan

आंबोली, चौकुळ परिसरात ऊस उत्पादनासाठी जिल्हा बँक आर्थिक पाठबळ देणार : अध्यक्ष मनिष दळवी यांचे आश्वासन

सावंतवाडी,दि.१०: आंबोली, चौकुळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग या भागात ऊस उत्पादनाला चालना देण्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे आर्थिक सहकार्य सिंधुदुर्ग जिल्हा बँक करेल, असे ठोस आश्वासन बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी पुढे यावे, त्यांना लागणारे आर्थिक पाठबळ बँक निश्चितपणे पुरवेल, असे ते म्हणाले.

सोमवार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी आंबोली ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शेतकरी मेळावा व ऊस पीक परिसंवाद’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम अथर्व इंटरट्रेड प्रा. लि., कोल्हापूर (दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हलकर्णीचे लीज्ड युनिट) आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील माजी शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे उपस्थित होते. त्यांनी ऊस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, लागवड पद्धती आणि अधिक उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचा उपस्थित शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, अथर्व-दौलत साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे आणि संचालक विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला आंबोली, चौकुळ आणि पंचक्रोशीतील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिसंवामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये ऊस लागवडीबाबत नवीन उत्साह निर्माण झाला आहे.

Exit mobile version